Sunday 18 March 2018

कोंडनाळ-मकरंदगड-हातलोट घाट

                   बिरमणीतून दिसणारे सह्याद्रीचे सुंदर दृश्य

दिवस १:१० मार्च २०१८
उन्हाळा म्हणजे डोंगरयात्रा करायला माझा आवडता ऋतू त्यातच यावेळीचा उन्हाळा जरा जास्तच कडक असं वाटू लागताच एखादा कडक ट्रेक करून घ्यायचं ठरलं.प्रसादने कोंडनाळ-मकरंदगड-हातलोट घाट-अंगठेसरी-नाळेची वाट ठरविल्यावर उन्हाळ्यात तोंडाला पाणी सुटलं असं म्हणायला हरकत नाही.
रात्री १२ च्या सुमारास ८ जणांचं मंडळ खेडच्या मार्गाला लागलो.माणगावला चहा ब्रेक उरकून झुंजूमुंजू व्हायच्या वेळी बिरमणी गाठलं.गाडीतलं मंडळ अजूनही साखरझोपेत होत.प्रसाद मात्र रात्रभर न झोपताही लागलीच गावात जाऊन वाटाड्याची बांधणी करून आला.

                        स्वच्छ अन सुंदर बिरमणी गाव 
आन्हिकं उरकून एका आजींच्या घरात चीझ मॅग्गी अन चहा बनवला.नाश्ता उरकून बरोबर सकाळी ८ ला बिरमणीच्या ईशान्येला जाणाऱ्या वाटेने निघालो.बिरमणी सोडताच कच्चा रस्ता लागतो.येत्या ३-४ वर्षात बिरमणी ते हातलोट पक्का रस्ता झाल्यानंतर जावळी भागातील दुर्गमतेला उतरती कळा लागणार असा मनाला उदास करणारा विचार घोळवत २० मिनिटांत काळभैरव मंदीराजवळ पोहोचलो.जवळच बारमाही पाण्याचा झरा आहे.उन्हाळ्यात कोंडनाळेत कुठेच पाणी नसल्याने पाण्याचा पुरेसा साठा घेऊन निघालो.मंदिरामागून मळलेली पायवाट शेताडातून आडवी तिडवी घेत सह्याद्रीच्या पायथ्याला पोहोचवते.डाव्या बाजूला जगबुडी नदीचं पात्र जवळ आलं की डावीकडची वाट जगबुडी ओलांडून हातलोट घाटासाठी असुन चांगली मळलेली आहे तर साधारण उजवीकडे जंगलात शिरणारी वाट कोंडनाळेसाठी असुन या वाटेचा वापर अगदीच नगण्य आहे.उजवी घेत कोंडनाळेच्या वाटेला लागलो.वेळ:सकाळी ८.४५
                         कोंडनाळेची सुरुवात 
 १० मिनिटं किर्रर्र जंगलातून चालल्यावर कोंडनाळेत पोहोचलो.इथून सरळ कोंडनाळेतून चढाई न करता नाळेच्या पलीकडून नाळेच्या समांतर जाणाऱ्या पुसटश्या वाटेने चढाईला सुरुवात केली.साधारण पाऊण तास नाळेच्या डाव्या बाजूने चढाई केल्यावर वाट कोंडनाळेत उतरते.या वाटेने आल्याने कोंडनाळेच्या खालच्या टप्प्यातल्या मोठ्या दगडांना बगल देत पायावरचा थोडाफार ताण कमी झाला.जर ही वाट नाही सापडली तर सरळ नाळेतून चढाई करावी.आता कोंडनाळ इतर सह्याद्रीतल्या नाळेसारखी भासते फरक एवढाच नाळ ही ऐसपैस असून मोठाले दगड आहेत.पुढची वाट म्हणजे आपापल्या इच्छेनुसार पाय ठेवायला दगड निवडायचा अन सोपी वाट शोधून उंची गाठत राहायचं.सकाळची वेळ असल्याने खडक अजूनही गार होते त्यामुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता.अर्धा तास कधी झाडोऱ्यातून कधी उघड्यावरून चढाई केल्यावर एका ठिकाणी उजवीकडून एक नाळ अन डावीकडून एक नाळ अन समोरची कोंडनाळ अशा त्रिवेणी संगमावर पोहोचलो.दाट झाडोरा बघून थोडासा पोटोबा करण्यात आला.वेळ:सकाळी:१०.१५
                     कोंडनाळेत भ्रमणमंडळ
                             कोंडनाळेत भ्रमणमंडळ
                  कोंडनाळ
 आता थोडाफार उन्हाचा चटका अन उष्मा जाणवायला सुरुवात झाली होती.नाळ आता अरुंद होत जाते.समोर मकरंदगडाची पश्चिम भिंत रौद्र भासते.मागे सुमार-महिपतगडाचा नजारा दिसतो.एका तासानंतर परत डावीकडून एक अन उजवीकडून एक अशा दोन नाळा मुख्य नाळेला मिळतात.यातल्या उजव्या नाळेतून पुढची चढाई आहे पण या नाळेत सुरुवातीलाच मोठाले दगड पडल्यामुळे सरळ जात उंच सरळसोट कड्याजवळ पोहोचलो.उजवीकडे काही झाडे  नजरेस पडली की डोंगराला बिलगून आडवं जात ५ मिनिटांत आपण उजवीकडच्या नाळेत पोहोचतो.१५ मिनिटांची माती अन दगडमिश्रित चढाई असून बरेचसे मोकळे दगड पायाखालून सुटायला तयारच असतात त्यामुळे खालच्या डोंगरयात्रींची काळजी घ्यावी.थोडासा झाडोरा आला अन कोंडनाळ माथा नजरेच्या टप्प्यात आला.बरोबर मध्यान्हाला माथा गाठला अन मागे रौद्र सह्याद्रीच सुंदर डोळ्यात साठवत पूर्वेकडे घोणसपूरकडे वाटचाल सुरु केली.वेळ दुपारी:१२.३०

   कोंडनाळेत या ठिकाणी उजवीकडून येणाऱ्या नाळेत चढाईला वळावे 
        कोंडनाळेतुन दिसणार सह्याद्रीच रौद्र रूप 
 १० मिनिटांची मवाळ चढाई करत मकरंदगडाच्या दक्षिण बाजूच्या पदरात पोहोचलो.सपाटीने चालत घोणसपूर गाठून लागलीच मल्लीकार्जून मंदिरात आसरा घेतला.घरून आणलेल्या शिदोऱ्या उघडल्या अन पंचपक्वान्नावर तुटून पडलो.अर्धा तास गर्द सावलीत वामकुक्षी घेऊन मंडळ पुढच्या चढाईला तयार झाले.मल्लीकार्जून मंदिराच्या बाजूने मकरंदगडावर पोहोचायला २५ मिनिटे लागली.बरोबर माथ्याजवळ गायी-गुरांनी वाट अडवल्यामुळे गडफेरी तशीच ठेऊन मल्लीकार्जून मंदिर गाठले अन मंदिराच्या मागून हातलोटकडे उतराई सुरु केली.वेळ दुपारी:३.१५
          मधू-मकरंदगड दक्षिणेकडील पदरातून 
                                   रम्य घोणसपूर गाव  
       मल्लीकार्जून मंदिर अन मकरंदगडाचा माथा 
वाट चांगलीच उताराची अन घनदाट जंगलातुन असून वासोट्याच्या वाटेची आठवण करून देते.सुंदर मळलेल्या ऐसपैस वाटेने ४५ मिनिटांत हातलोट गावात पोहोचलो.गावाच्या सुरुवातीलाच दगडी पाण्याचं टाकी असून थंडगार पाणी पिऊन शरीर अन मन तृप्त झाले.नदीवरचा पूल ओलांडून पश्चिमेकडे जाणाऱ्या कच्या रस्त्याने वाटचाल सुरु केली.डावीकडे मकरंदगडाचे सुंदर दृश्य दिसत राहत.४० मिनिटे कच्या रस्त्यावर चालल्यावर डावीकडची पायवाट पकडून जंगलात शिरलो. छोटस नदीपात्र ओलांडून वाट साधारण चढाईला लागली अन गर्द जंगलातून हातलोटच्या खिंडीत पोहोचलो.वेळ संध्याकाळी:५
         हातलोट गावातून दिसणारा मकरंदगड
                   हातलोट घाटाची सुरुवात 
 सुरवातीलाच काही खडकात कोरलेल्या पायऱ्या अन पाण्याचं छोटस टाक हातलोट घाटाच्या गतवैभवाची साक्ष देतात.काही क्षण विसावून उतराई सुरु केली.घाट चांगला ऐसपैस अन बांधलेला असला तरी गायी-गुर तसेच मेंढ्यांच्या नेहमीच्या वापरामुळे घाटातील सर्व दगड खिळखिळे झालेले आहेत.वाट जास्त उताराची नसली तरी मोकळ्या दगडांमुळे अन मातीमुळे सावधपणे उतरावी लागत होती.४० मिनिटानंतर वाटेपासून उजवीकडे एक पाण्याचं टाक असून त्याला पांडव टाक म्हणतात अशी माहिती मामांनी सांगितलं.पाणी पिण्यायोग्य नाही.पुढच्या अर्धा तासाच्या उतराईमध्ये २-३ वेळा ओढे पार केल्यानंतर डावीकडे कोंडनाळ अन मकरंदगडाची पश्चिम बाजूने (मधू गड) दर्शन दिले.पुढच्या १० मिनिटांत जगबुडी नदी पार करत पायथा गाठला.सकाळी गेलेल्या वाटेवर परतीचा प्रवास सुरु झाला अन पायांच्या वेग वाढला.पश्चिमेकडे सूर्यनारायण अस्ताला जात होते अन मागे सह्याद्री ऊंचच उंच भासत होता.
    हातलोट घाटाच्या मध्यावर असलेलं पांडव टाक

दिवेलागणीला बिरमणीत पोहोचलो अन एका दुकानासमोर सर्व मंडळ ठाण मांडून बसलं.बरीचशी शीतपेयं पोटात ढकलून बिरमणी गावाला निरोप दिला.पुढच्या १५ मिनिटांत कांदोशी गाठून जेवणाची सोय बघण्यात आली.गावात पूर्णपणे शुकशुकाट असल्याने थोडा वेळ गेला.कांदोशीतील प्रसिद्ध रामवरदायिनी मंदिरामागे असलेल्या नैसर्गिक गोमुखातील पाणी बादलीत घेऊन अंघोळीच्या ठिकाणी जाऊन अंघोळी उरकल्या.मस्त जेवण चोपून शेजारी असलेल्या हनुमान मंदिरात पथाऱ्या पसरल्या.पूर्वेला सह्याद्रीची उंच रांग महाकाय दिसत होती.उद्या ह्याच रांगेतून अंगठेसरी हा अफलातून ट्रेक करायचा होता.
दिवसभराच्या सुंदर डोंगरयात्रेमुळे अन समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेमुळे पाठ टेकवल्यावर वेगळंच सुख मिळत होत.आजची झोप समाधानी होणार यात शंकाच नव्हती.वेळ रात्री:११

या डोंगरयात्रेचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 


भाग १
                                                                     भाग २

नोट:
१.कोंडनाळ कुठेही अवघड नाही तरीही कोंडनाळेने शक्यतो चढाई करावी अन हातलोट घाटाने उतरावे. कोंडनाळ उतराई तशी अवघड नाही पण मोठ्या डोंगरयात्रेनंतर नवख्या मंडळींच्या पायावर जास्त ताण पडू शकतो. 
२.कोंडनाळ सकाळी लवकर चढली किंवा उतरली तर उन्हाचा दाह अन उष्मा अजिबात जाणवणार नाही पण दुपारनंतर नाळेतील दगड तापून नक्कीच घामटा काढू शकतात.
३.उन्हाळ्यात कोंडनाळेतील पाण्याचे डोह आटलेले असल्याने घोणसपूर/काळभैरव मंदिर बिरमणी गाठेपर्यंत पाणी कुठेच नाही.
४.घोणसपूर-दाभे-अंगठेसरी-कांदोशी किंवा घोणसपूर-दाभे-झाडणी-निरपजी मंदिर(कांदाट)-नाळेची वाट अशी डोंगरयात्रा करता येईल
५.हातलोट पासून हातलोट घाटाच्या अलीकडे उत्तरेला आवेरी खिंड-पार-प्रतापगड अशी डोंगरयात्रा करता येऊ शकेल.पुढच्या वेळी हा मार्ग शोधण्याचा प्रयत्न राहील. 

महत्वाच्या नोंदी :
सुरवात :बिरमणी शेवट :बिरमणी
मार्ग: बिरमणी-कोंडनाळ-घोणसपूर-मकरंदगड-हातलोट-हातलोट घाट-बिरमणी
एकूण डोंगरयात्रा:१६.९ किमी
श्रेणी:मध्यम

चढाई उतराईतील टप्पे:
बिरमणी (१४३ मीटर्स)-कोंडनाळ माथा(९१० मीटर्स)-घोणसपूर(९९० मीटर्स)-मकरंदगड(१२३०मीटर्स)-हातलोट(६३६मीटर्स)-हातलोट माथा-(७०६मीटर्स)

या ट्रेकचा उत्तरार्ध अंगठेसरी-नाळेची वाट इथे वाचा 
अंगठेसरी-नाळेची वाट

प्रसन्न वाघ 
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 

10 comments:

  1. मस्त सरजी!! याचीच वाट पाहत होतो.

    ReplyDelete
  2. मस्त, आम्हाला कधी घयुन जाणार

    ReplyDelete
  3. हटके रूट .. उपयुक्त माहिती मस्त प्रसाद आणि टीम

    ReplyDelete
  4. मस्त माहिती आणि फोटोज..मागच्या १ ते दिड वर्षात बऱ्याच आडवळणाच्या घाटवाटांची माहिती ट्रेकर्सना तुझ्या ब्लॉग मुळे झाली ..किप इट अप

    ReplyDelete
  5. पुढील मे महिन्यात करण्याचा प्लॅन आहे ब्लॉक वाचून खूपशी माहिती मिळाली लिखाण सुंदर आहे

    ReplyDelete